धुळ्यात झाड अंगावर पडून एकाच कुटूंबातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू

धुळे : पोलिसनामा ऑनलाइन

धुळ्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. झालेल्या अवकाळी पावसामुळे चिंचेचे मोठे झाड कोसळुन पडल्याने एकाच कुटुंबातील चार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर, एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पावरा कुटुंबातील मृतांमध्ये महिलेसह तीन बालकांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील वरखेडी गावाच्या शिवारात प्रभाकर दादू गुजर यांच्या शेतात दादूराम जामा पावरा (३२) रा.सापखडकी ता.पानसमेल जि.बडवाणी मध्यप्रदेश हे सालदार असून ते शेतातील पत्र्याचे शेडमध्ये कुटुंबीयांसह राहतात. काल (दि.२) रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेजारील चिंचेचे झाड पत्र्याचे शेडवर कोसळले. यामध्ये शेडमध्ये झोपलेले दादूराम पावरा जखमी झाले तर त्यांची पत्नी अनिताबाई (२८), मुलगा वशिला (०३), मुलगी पिंकी(०२),रोशनी(०१) असे चौघेजण दाबले गेल्याने जागीच ठार झाले. चौघांना मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले असून जखमी दादूराम पावरा यांचेवर उपचार सूरु आहेत. याबाबत पोलिस शिपाई जे.एस ईशी यांनी तालुका पोलिसांना माहिती कळविली आहे.