तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या 2 भाविकांचा शॉक बसून मृत्यू

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लाखो लोकांचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील आणि परराज्यातील अनेक भाविक तुळजापुरमध्ये येत असतात. सध्या सुरु असलेल्या नवरात्र उत्सवामुळे तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे. अशातच या उत्सवाला गालबोट लागले असून परराज्यातून आलेल्या दोन भाविकांचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली.

मुकेश बिमसेन भिलंगडे (वय-18) आणि विनोद मारुती शेरकर असे मृत्यू झालेल्या भाविकांचे नाव आहे. हे दोघेही कर्नाटकातील बिदर येथील बसवकल्याण येथील रहिवाशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश आणि विनोद हे दोघे बसवकल्याण येथून देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूर येथे आले होते. आज पहाटे बंद असलेल्या पार्किंमध्ये ते लघुशंका करण्यासाठी गेले होते.

विनोद आणि मुकेश हे दोघे उस्मानाबाद रोडवर असलेल्या मलबा हॉस्पिटलच्या समोरील खासगी पार्किंगमध्ये लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या लोखंडी खांबामध्ये विजेचा प्रवाह सुरु असल्याची माहिती त्यांना नसल्याने त्यांचा लोखंडी खांबाला स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा जोरदार शॉक बसला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या तुळजापूरमध्ये नवरात्र उत्सव सुरु असून या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, या ठिकाणी वाहन चालक किंवा वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही.

Visit : Policenama.com