पालीला पळवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

गुंटूर/आंध्र प्रदेश  : वृत्तसंस्था – घरात शिरलेल्या पालीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात एका पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. शेष राव असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते सध्या बदलीच्या प्रतीक्षेत होते. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फूटेजमध्ये शेष राव हातात झाडू घेऊन घरात शिरलेल्या पालीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचवेळी त्यांचे संतुलन बिघडले आणि ते दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडले, असे व्हिडीओत दिसत आहे. या दुर्घटनेत शेष राव गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शेष राव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, शेष राव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राव यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. या घटनेची नोंद पट्टाभीपुरम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.