Coronavirus : देशात ‘कोरोना’मुळं आतापर्यंत 1000 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोविड-१९ च्या वाढत्या प्रकरणांमध्ये मागच्या २४ तासात १८९७ प्रकरणं समोर आली आहेत आणि आणि ७३ रूग्णांच्या मृत्यूनंतर देशात मृतांची संख्या वाढून १००७ झाली आहे. आतापर्यंत देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाची ३१३३२ प्रकरणांची नोंद झाली असून त्यात १११ परदेशी रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संक्रमित लोकांच्या बरे होण्याची गती देखील वाढली आहे आणि गेल्या २४ तासांत कोरोनाने संक्रमित ८२७ लोक बरे झाले असून अशा लोकांची संख्या ७६९६ वर पोहोचली आहे.

बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक गंभीरपणे प्रभावित असलेल्या महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे आणि गेल्या एक दिवसात ७२८ नवीन रुग्णांनंतर संक्रमितांची संख्या ९३१८ वर पोहोचली आहे आणि दरम्यान आणखी ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या महामारीमुळे मृतांची संख्या ४०० झाली आहे. त्याचबरोबर राज्यात १३८८ संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या २४ तासात १९६ नवीन प्रकरणं समोर आली असून संक्रमित रुग्णांच्या संख्येत गुजरात दुसर्‍या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ३७४४ पर्यंत पोहोचली आहे आणि १९ लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या १८१ वर पोहोचली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीचीही परिस्थिती चिंताजनक बनली असून गेल्या २४ तासांत २०६ नवीन घटना घडल्यामुळे एकूण ३३१४ लोकांना संक्रमण झाले आहे. दिल्लीत या आजाराने मृत्यूंची संख्या ५४ वर पोहोचली आहे, तर एकूण १०७८ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर राजस्थानमध्ये गेल्या २४ तासांत १०२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यांची संख्या २३६४ झाली आहे. राज्यात संक्रमणामुळे आणखी पाच लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. तामिळनाडूमध्ये १२१ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली असून संक्रमित रूग्णांची संख्या २०५८ झाली आहे आणि आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत २३८७ लोकांना संक्रमण झाले आहे आणि गेल्या २४ तासात आणखी १० संक्रमित लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या सात ते १२० पर्यंत गेली आहे.

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात ९८ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर संक्रमितांची संख्या २०५३ पर्यंत गेली आहे आणि तीन लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे. त्याचबरोबर उपचारानंतर ४६२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

तेलंगणामध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे कोणतेही नवीन प्रकरण समोर आले नसून कोणत्याही संक्रमित व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला नाही. आतापर्यंत राज्यात १००४ लोकांना लागण झाली असून एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये संक्रमितांची संख्या ४८१ वर गेली असून आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशातील दक्षिण भारतीय राज्यात १२५९ लोकांना आणि कर्नाटकात ५२३ लोकांना लागण झाली असून क्रमशः ३१ आणि २० लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये संक्रमितांची संख्या ५६५ असून आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय पंजाबमध्ये १९, पश्चिम बंगालमध्ये २२, हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी तीन, बिहारमध्ये दोन आणि मेघालय, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये एकेकाचा मृत्यू झाला आहे.