दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या 42 वर, दोषींना सोडणार नसल्याचं नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : दिल्ली हिंसाचारामध्ये बळी पडलेल्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे. शुक्रवारी मृतांची संख्या वाढून ४२ वर पोहोचली. दिल्ली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत (शुक्रवारी दुपारी) गुरु तेग बहादूर रुग्णालयात (GTB Hospital) मध्ये ३८, लोक नायक जय प्रकाश रुग्णालयात (LNJP Hospital) तीन आणि जग परवेश चंद्र रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार आणि उपद्रवात आतापर्यंत २७५ पेक्षा अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

तर पूर्वोत्तर दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात दुकाने उघडली गेल्याने आता परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. पूर्वीप्रमाणेच रस्त्यांवर वाहतूक सुरु झाली आहे. गेल्या सोमवारपासून बाधित भागात सुमारे ७ हजार अर्धसैनिक तैनात केले आहेत. शांतता कायम ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांचे शेकडो कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. या दरम्यान दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने गस्त घालून आहेत. याव्यतिरिक्त तणावाचे वातावरण सामान्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केली जात आहेत.

गोकलपुरी येथे कुटूंबाला भेटण्यासाठी गेलेल्या दोन भावांची हत्या
शुक्रवारी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून गोकलपुरी मध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आढळले. त्यांच्या परिवारास त्यांचे मृतदेह जीटीबी रुग्णालयात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आमिर गाझियाबादमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि हाशिम त्याचा सहाय्यक होता. त्यांचे पोस्टमॉर्टम शनिवारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘दिल्ली पोलिसांनी १०० हून अधिक गुन्हे केले दाखल, दोषींना कठोर शिक्षा मिळणार’
शुक्रवारी नवी दिल्ली पोलिस आयुक्त म्हणून घोषित झालेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस.एन. श्रीवास्तव म्हणाले की, गेल्या ६० तासांच्या दरम्यान कुठेही हिंसाचाराचा प्रकार घडलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पोलिस त्या भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांचे म्हणणे ऐकले आहे. आम आदमी पक्षाचे नेते ताहिर हुसेन यांच्याबाबत विचारले असता श्रीवास्तव म्हणाले की कोणत्याही एका खटल्याची पर्वा नाही, आम्ही शंभराहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. दोषींना कठोर शिक्षा होईल. असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली हिंसाचाराच्या खटल्याची सुनावणी १३ एप्रिल रोजी होईल
गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात दिल्ली हिंसाचार प्रकरणाची सुनावणी झाली होती. उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारला चिथावणीखोर निवेदनावर दाखल याचिकेवर सविस्तर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. कोर्टाने गृह मंत्रालयाला चार आठवड्यांत उत्तर देण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही १३ एप्रिल रोजी होणार आहे.