वर्षाच्या शेवटी विविध कारणांमुळे मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती

पोलिसनामा ऑनलाईन – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विविध भागातून नागरिक कामाच्या निमित्ताने दाखल होत आहेत. मात्र, विविध आजारांसह कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे चार महिन्यांत मुंबईतील मृत्यूसंख्येत मोठी वाढ झाली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास वर्षअखेरीस मुंबईतील एकूण मृतांची संख्या एक लाखाच्या वर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मुंबईत मे ते ऑगस्ट चार महिन्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 60 हजार 190 जणांचा मृत्यू झाला होता. तर यंदा जानेवारी ते ऑगस्ट काळात 73 हजार 655 जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात जाण्यास केली जाणारी टाळाटाळ, तसेच खाटा मिळण्यातील अडचणींमुळे मृत्यूसंख्या वाढत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी पालिकेकडे अर्ज केला होता. अर्जाच्या आधारे पालिकेने यादव यांना मृत्यूबाबतची महिनानिहाय आकडेवारी सादर केली. त्यातून मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत असल्याची माहिती उजेडात आली आहे.