Nashik News : दुर्दैवी ! धरणात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – अजंग (ता. मालेगाव) येथील दोघा सख्ख्या भावाचा विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवारी (दि. 24) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री उशिरा दोघांवर अजंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही कर्ती मुले गमावल्याने आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. तर दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे वडेल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

हर्षल देवीदास जाधव (वय 22) आणि रितेश देवीदास जाधव (वय 18, दोघेही रा. अंजग) असे बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजंग येथील हर्षल आणि रितेश दोघे भाऊ बुधवारी निमशेवडी येथे मित्राच्या लग्नासाठी गेले होते. विवाहानंतर दोघे भाऊ विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणावर गेले होते. त्या वेळी धरणावरील सुरकुंडीवरून रितेशचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हर्षलनेही पाण्यात उडी घेतली. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. हर्षल नाशिक येथे एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर रितेश मालेगाव येथे बारावीत होता. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर मोताळे व सहकारी तपास करीत आहेत.