धक्कादायक…. विजेचा शाॅक लागून शेताच्या बांधावरच पती-पत्नीसह मुलांचा मृत्यू

साताराः पोलीसनामा आॅनालाईन

विजेचा शाॅक लागून शेताच्या बांधावर एकाच कुटूंबातील तीघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना साताऱ्यातील वर्णे गावात घडली आहे. मृतामध्ये पती-पत्नीसह मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुरेश पांडूरंग काळंगे (वय48), संगीत सुरेश कांळगे (पत्नी, वय 40), आणि मुलगा सर्वेश सुरेश काळंगे (वय 16) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरेश काळंगे हे पत्नी व मुलासोबत वर्णेतील डोंगर शिवारातील पट्ट्यात शेताकडे गेले होते. सकाळी 8.30 च्या दरम्यान रानात गेलेला हा परिवार सायंकाळपर्यंत घरी न आल्यामुळे सुरेश यांचा मावसभाऊ श्रीमंत काळंगे हा त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला असता तिघांचेही मृतदेह त्यांना बांधावर दिसून आले.

या घटनेमुळे परिसारात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. शेतातील पिकांचे डुकरांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतात विजप्रवाह असलेल्या तारा लावण्यात आल्या आहेत. याच तारांचा शाॅक बसून मृत्यू झाल्याचे काहींचे म्हणणे आहे तर काही जण मात्र त्याबाबत शंका व्यक्त करत आहेत. विहरीवरील पाण्याची मोटार सुरू करत असताना सुरेश यांना शाॅक बसला. त्यावेळ जवळच असलेली पत्नी संगीता व मुलगा सर्वेश त्यांच्या मदतीला धावले. मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसून त्यांचाही मृत्यू झाल्याचीही चर्चा गावात सुरू होती.

सदरचे वृत्त गावात गावात पसरताच गावावर शोककळा पसरली. सुरेश यांचे आई-वडील वृद्ध असून ही घटना समजताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. सुरेश कांगळे यांना एक मुलगी असून ती पुणे येथे इंजजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. दरम्यान घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात सुरू होती,