काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पक्षात 2 गट, मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली वर्किंग कमिटीची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीबद्दल बैठकीत चर्चा झाली. यावेळी पक्षातील मतभेद स्पष्टपणे समोर आले. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबद्दल पक्षात दोन मतप्रवाह आहेत. या दोन गटांच्या नेत्यांमध्ये असलेलं भांडण आजच्या बैठकीत समोर आलं.

शर्मा आणि गेहलोत यांच्यात शाब्दिक चकमक

दरम्यान, काँग्रेस पक्षात निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडली आहे. त्यात काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत समोरासमोर आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शर्मा आणि गेहलोत यांच्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जोरदार जुंपली. येत्या जून महिन्यात काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यात काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अशोक गेहलोत आणि आनंद शर्मा यांच्यात जोरदार जुंपली. तुम्ही दर ६ महिन्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी करता. तुम्हाला पक्ष नेतृत्त्वावर विश्वास नाही का, असा सवाल गेहलोत यांनी शर्मांना विचारला. या वादात पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना मध्यस्थी करावी लागली. दोन्ही नेत्यांनी जास्त भावुक होऊ नका, असं आवाहन करत सोनी यांनी गेहलोत आणि शर्मा यांना शांत केलं.

खासदार राहुल गांधींनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. काही महिन्यांपूर्वी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया यांना पत्र लिहिलं होतं. पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष द्या, अशी मागणी पत्रातून करण्यात आली होती. या पत्रामुळे काँग्रेसमधील गटातटाचं राजकारण पुन्हा दिसून आलं होतं. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. जून २०२१ मध्ये पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.