शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बैठका पार पडल्यावर रात्री पत्रकारांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासह अनेक विषयांवर भाष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा केव्हाही व कधीही विरोध नाही, मात्र शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे फडणवीस यांनी म्हंटल आहे.

फडणवीस म्हणाले, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय गोंड, आदिवासी समाजाशी निगडित असल्याने या प्राणिसंग्रहालयास गोंडवना नाव देण्याची गोंड समाजाची मागणी होती व ती मान्यही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत.

निकाल लागून दोन दिवास होत नाही तोपर्यंत वीजबिल थकबाकीदारांच्या जोडण्या तोडण्याचा महावितरणचा निर्णय हा सरकारच्या विश्वासघाताचा नमुना आहे, अशी टीका करीत बिल्डरांच्या शुल्कसवलतीसाठी राज्य सरकारकडे निधी आहे, पण सर्वसामान्यांच्या वीजबिल सवलतीसाठी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आंदोलन ही ढोंगबाजी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.