BSNL आणि सार्वजनिक रोजगाराबाबतही निर्णय घेतला, पण आचारसंहितेमुळे बोलणार नाही : रविशंकर प्रसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली त्यावेळी केवळ दोन मोबाईल कंपन्या होत्या. आता २६८ मोबाईल कंपन्या असून त्यामध्ये सहा लाख रोजगार निर्माण झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ४० लाख लोक काम करत आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत १४ कोटी युवकांना कर्ज दिले आहे. तसेच रस्ते निर्माण केले जात असून वीज आणि मेट्रोचे काम सुरू आहे, तेथेही रोजगार उपलब्ध होत आहेत. बीएसएनएल आणि सार्वजनिक रोजगाराबाबतही निर्णय घेतला असून निवडणुक आचारसंहितेमुळे त्यावर आता बोलणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज येथे दिले. तसेच मी मुंबईमध्ये केलेले तीन सिनेमे एका आठवड्यात १२० कोटी रुपयांचा बिझनेस करतात, तर मंदी कुठे आहे? हे विधान मागे घेत असल्याचेही प्रसाद यांनी नमूद केले.

भाजप- शिवसेना- रिपाइं (ए) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे आलेल्या रविशंकर प्रसाद यांची डेक्कन येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, रिपाइंचे शहरअध्यक्ष अशोक शिरोळे, भाजपचे शहर सरचिटणीस गणेश बीडकर, प्रवक्ते उज्वल केसकर याप्रसंगी उपस्थित होते.

रविशंकर प्रसाद म्हणाले, की जागतिक मंदीचे परिणाम निश्‍चित जाणवत आहेत. संपुर्ण जगभर अर्थव्यवस्थेत चढ उतार होत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहेत. बँकांना ७० हजार कोटी रुपये दिले असून उद्योगांसाठी ३० हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच करचनेत सुधारणा करून उद्योगांना पाठींबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास होत आहे. महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. बेरोजगारी बाबत आलेल्या अहवालांवर विस्तृत चर्चा झाली असून तो मुद्दा बाजूला पडला आहे.

प्रत्यक्षात मागील काही वर्षात रोजगार वाढला आहे. २०१४ ला आम्ही सत्तेत आलो, त्यावेळी देशात दोन मोबाईल कंपन्या होत्या आता २६८ कंपन्या झाल्या असून तेथे सहा लाख रोजगार निर्माण झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ४० लाख थेट रोजगार निर्माण झाले असून त्यावर अप्रत्यक्षरित्या सव्वा कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. रस्ते बांधणी, मेट्रो आणि वीज क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर कामे सुरू असून तेथे रोजगार निर्माण होत आहे. मुद्रा योेजनेअंतर्गत १४ कोटी युवकांना स्वंयरोजगार उपलब्ध झाला आहे. तेथे प्रत्येकी एकाला नोकरी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली देशाचा गतिमान विकास सुरू असून जनतेला भाजपवर विश्‍वास आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पुर्ण पाच वर्षे काम करून महाराष्ट्रात इतिहास निर्माण केला आहे. स्वच्छ प्रशासन आणि स्पष्ट नितीमुळे महाराष्ट्र देशात अग्रेसर झाले आहे. कलम ३७० हटविल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला नाही? असा टीकाकारांना प्रतिप्रश्‍न करत रविशंकर प्रसाद यांनी आता कश्मिरमध्ये देशभरात ज्या १०६ कायद्यांची अंमलबजावणी होत नव्हती ते तेथे लागू झाले आहेत, असे स्पष्ट केले.

‘ते’ विधान मागे
मुंबईमध्ये काल पत्रकार परिषदेमध्ये रविशंकर प्रसाद यांनी एकाच आठवड्यात तीन सिनेमांनी १२० कोटी रुपयांचा बिझनेस केला, कुठे आहे मंदी? असे विधान केले होते. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मुंबई ही चित्रपट क्षेत्राची राजधानी आहे. या पत्रकार परिषदेत मंदी संदर्भात विचारले असता मी शासन करत असलेल्या उपाययोजनांबाबत सांगत होतो. त्यावेळी कमल नहाटा या व्यक्तिने चित्रपट क्षेत्राशी संबधित विचारलेल्या प्रश्‍नासंदर्भात वरिल विधान केले होते. मात्र, माध्यमांनी त्याचा विपर्यास्त केला. मी खूप संवेदनशील आहे. ते विधान मी मागे घेत आहे, असे म्हणत रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Visit : Policenama.com