सुशिलकुमार शिंदे नव्हे ‘हा’ मराठी नेता होणार काँग्रेसचा अध्यक्ष ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर सुशिलकुमार शिंदे यांची निवड होणार असल्याची चर्चा असतानाच महाराष्ट्रातील रामटेक मतदार संघातील माजी खासदार मुकुल वासनिक यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या नावाची घोषणा शनिवारी (दि.१०) होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. मुकुल वासनिक यांच्या रुपाने दलित नेत्याला काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या अनेक महिन्यापासून काँग्रेस अध्यक्षपदाबाबत गोंधळाचे वातावरण होते. राहुल गांधी यांना अध्यपदावर राहण्याचा अनेकांनी अग्रह केला. मात्र राहुल गांधी हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. राहुल गांधी यांच्यानंतर प्रियंका गांधी यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष करावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, ही चर्चा मागे पडल्याने ५९ वर्षीय वासनिक यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ए. के. अँटनी, अहमद पटेल आणि के. व्ही. वेणुगोपाल या वरिष्ठ नेत्यांनी आज यूपीए अध्यक्षा व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायला हवी, असा आग्रह या नेत्यांनी धरला.

कोण आहेत मुकुल वासनिक ?

मुकुल वासनिक हे युपीए सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री होते. त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा सांभाळली आहे. १९८४ ते १९९० या काळात ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. युवा खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला होता. वयाच्या २५ वर्षी ते बुलढाणा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते. १९९१, १९९८ मध्ये बुलढाणा तर २००९ मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.

आरोग्यविषयक वृत्त