‘पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय लवकरच घेणार’, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची ग्वाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस, डॉक्टर यांना कोरोना काळात कर्तव्य बजावताना जीव गमवावा लागला तर त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार 50 लाखांचे सुरक्षा विमा कवच उपलब्ध करून दिले जाते. पत्रकारांनाही हा नियम लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी दिली आहे.

पुण्यातील विधानभवनात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू पार्दुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचं शनिवारी (दि 5 सप्टेंबर) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी बोलताना टोपे म्हणाले, “राज्य शासन देखील पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभं असून 50 लाखांचं विमा कवच देण्याचा विचार आहे. याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांचाही या निर्णयाला पाठिंबा आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करून शिक्कामोर्तब करण्यात येईल. पुढील काळात राज्य सरकार जास्तीत जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहे” असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना टोपे म्हणाले, “लक्षणं न दिसणाऱ्यांसाठी यापुढील काळात रुग्णालयांच्या किंवा कोविड सेंटरच्या खाटा अडवल्या जाणार नाहीत. रुग्णांचा वाढता मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासन यंत्रणा कसोशीनं प्रयत्नशील आहे. रुग्णालयात भरती असणाऱ्या कोरोना रुग्णाच्या तब्येतीची माहिती नातेवाईकांना समजावी यादृष्टीनं रुग्णालयांनी खबरदारी घ्यावी. परंतु कोरोनाची लक्षणं दिसताच लगेच तपासणी करून उपचार घ्यावेत” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.