आंदोलनानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपूरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यासोबतच्या 11 कार्यकर्त्यांना मंदिरात प्रवेश करून मुखदर्शनही घेतले होते. त्यानंतर आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंदच राहणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबर पर्यंत दर्शनासाठी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. 22 मार्चपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. अनलॉकच्या चौथा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. यात धार्मिक स्थळे आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्यण राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मंदिर समितीने मंगळवारी एका पत्राद्वारे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्यण जाहीर केला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर खुले करावे, या मागणीसाठी कालच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली पंढरपुरात आंदोलन केले होते. त्यानंतर आठ दिवसांनी मंदिर उघडले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना आश्वासन दिले होते. सरकारच्या या आश्वासनाला काही तास उलटून गेल्यानंतर लागलीच मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.