Sanjay Raut : ‘कोरोना’ महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा’; देशाने उद्धव ठाकरेंचं अनुकरण करावं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देशाची आजची ही परिस्थिती राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच ही राष्ट्रीय संकट असून राष्ट्रीय आपत्ती असल्याचे अनेकवेळा सांगितले होते. आज सर्वोच्च न्यायालयानं ही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

कोरोना राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आणि पत्राद्वारे केंद्राकडे केली आहे. कोरोना महामारी हे राष्ट्रीय संकट असल्याचे जगानेही मान्य केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत. कोरोना संकट काळात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय अॅक्टिव्ह झाले आहे. कोरोना कोर्टपर्यंत पोहचला असून त्यांच्या घरापर्यंत गेला आहे, असे मला वाटतेय. त्यामुळे देशाला नक्कीच काही तरी फायदा होईल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

देशात कोरोना संकट वाढत असून जनता दहशतीखाली आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. आतपर्यंत राज्याने या संकटाशी सामना केला आहे, याची दखल सर्वांना घ्यावीच लागेल. हे महाराष्ट्र मॉडेल आहे ते वापरुन देशात महामारीशी लढावचं लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.