Coronaviurs : कडक Lockdown मुळे मुळशीतील रुग्णसंख्येत घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशीतील पुर्व पट्ट्यातील पिरंगूट, भुगाव, कासारआंबोली, उरवडे, पौड, घोटावडे, भरे,अंबडवेट, लवळे, नांदे, भुकूम या गावांमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. या गावांत दररोज सापडणाऱ्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होती. मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावांच्या लोकप्रतिनीधींनी कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतल्याने रुग्णसंखेत घट झाली. मुळशी तालुक्याच्या पौड पोलिस स्टेशन हद्दीतील पूर्व भागातील मोठ्या गावात कोरोना बाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे होते.

या पार्श्वभूमीवर, १५ मे ते २५ दरम्यान दहा दिवस कडक लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय पिरंगूट येथे झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला होता, याचा परिणाम पाहता रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. दरम्यान, १५ मे, दि. १६ मे व १७ मे रोजी अनुक्रमे २००, ३०१, ९८ नवीन रुग्ण सापडले तर ४०४, ८१८, ८५८ अ‍ॅक्टीव रुग्ण होते. आठवड्याभरानंतर दि. २२ मे, दि. २३ मे व २४ मे रोजी अनुक्रमे १४७, ६६, ७८ नविन रुग्ण सापडले तर ३४४, ३४५, ३४८ अ‍ॅक्टीव रुग्ण होते. ही आकडेवारी पाहता रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसते.

आज ७८ नवीन रुग्णांची भर पडली. तर १७१५९ रुग्ण सापडले. यांतील १६६०९ रुग्ण बरे झाले आहेत. आज २०२ रुग्णांचा मृत्यू झालेला असुन ३४८ अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत. यापुढे लाॅकडाऊन शिथील झाले तरी लोकांनी मास्कचा वापर करुन सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. लाॅकडाऊनमध्ये नागरीकांनी सहकार्य केल्याने रुग्णांच्या संख्येत घट झाली.

-अजित कारंजकर(आरोग्य अधिकारी, मुळशी)

दहा दिवस सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व पोलिस यंत्रणा यांनी एकत्रित येऊन काम केले परिणामी रुग्णांचा वाढता आलेख कमी झाला. तरीसुद्धा नागरीकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये. बाहेर कामाला जाणाऱ्यानी डबल मास्क वापरणे तसेच घरातील सदस्यापासून दूर राहणे गरजेचे आहे.

-अशोक धुमाळ (पोलिस निरिक्षक, पौड पोलिस स्टेशन)