अमेरिकेच्या टेक्सासमध्ये बर्फाळ वादळ आणि थंडीचा कहर, 21 जणांचा मृत्यू

टेक्सास : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या टेक्सासमध्ये बर्फाळ वादळ सुरु झाले आहे. या वादळामुळे आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे या भागात लाखो लोक अडकले आहेत. आता संपूर्ण टेक्सासमध्ये बर्फाळ वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पावसाचा अंदाजही वर्तवला जात आहे.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रविवारीच टेक्सासमध्ये आपातकालीन संकटाची घोषणा केली होती. ‘व्हाईट हाऊस’कडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार, या भागात मदतीसाठी अभियान सुरु केले जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याचे समजल्यानंतर गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी बचाव सामग्री पोहोचण्यासाठी जोर दिला आहे. त्यांच्याकडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार, कंपन्या कोल, नॅचरल गॅस आणि विंड पॉवरच्या मदतीने पोहोचण्यावर भर देत आहे. मात्र, अनेक कंपन्या कोल, नॅचरल गॅस आणि विंड पॉवरच्या माध्यमातून वीज निर्मिती करू शकत नाहीत. त्यामुळे सध्या इथं पॉवर कटची अडचण येत आहे.

घरातील अनावश्यक डिव्हाईस अनप्लग करण्याचे आवाहन
Electric Reliability Council of Texas (ERCOT) ने लोकांना घरात सुरु असलेले अनावश्यक डिव्हाईस अनप्लग करण्याचे सांगितले आहे. याशिवाय काही दिवस कपडे धुण्यावरही बंदी घातली आहे. सध्या नागरिकांना उबदार कपडे घाला, असेही सांगितले आहे. PowerOutage.us च्या नुसार, 2.8 मिलियन ग्राहकांचे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच हवामानात बदल झाल्याने टेक्सास येथे येणारी अनेक विमाने उशीरा उड्डाण करत आहे. तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.