शेतकरी आंदोलन : दीप सिध्दूला शेतकर्‍यांनी पळवून लावले, व्हिडीओ झाला व्हायरल (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, काल (२६ जानेवारी) दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्च्या दरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये हिंसाचार घडला. त्यात तब्बल ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी व मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाले. या हिंसाचार प्रकरणी अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यातीलच एक नाव दीप सिद्धू. शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धूवर शेतकऱ्यांना भडकवल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यातच आता दीप सिद्धूचा एका नवीन व्हिडीओ समोर आला आहे. लाल किल्ल्यावरुन गायब झालेला दीप सिद्धू आज सकाळी पुन्हा आंदोलन स्थळी गेला होता. तेव्हा शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवत आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप केला. त्यामुळे दीप सिद्धू आणि त्याच्यासोबत आलेल्या काही जणांनी तेथून पलायन केले. दीप सिद्धूच्या मागे काही शेतकरी धावले. शेवटी दीप सिद्धू एका बाईकवरुन पसार झाल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

दरम्यान, लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवल्याचा दाव्यावर दीप सिद्धूने स्पष्टीकरण देत सांगितले, “आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही,” असे फेसबुकच्या माध्यमातून बोलताना तो म्हणाला.

दीप सिद्धूचे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अभिनेता सनी देओल यांच्यासोबत व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळवण्यासाठी त्याला पाठवल्याचा आरोप त्याच्यावर केला जात आहे.