गृह राज्यमंत्री केसरकरांनी ‘जादुटोणा’ केलाय ! नारायण राणेंचा भाजप प्रवेश अडकवलाय, शिवसेनेच्याच नेत्याचा आरोप

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केसरकरांनी अनेकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं तसेच करणी करुन त्यांनी नारायण राणेंचा पक्ष प्रवेश अडकवला आहे असा आरोप बबन साळगावकर यांनी केला आहे.

दीपक केसरकरांवर आरोप  करताना साळगावकर म्हणाले की, ‘दीपक केसरकर हे जादूगार आहेत. करणी करुन त्यांनी नारायण राणेंचा पक्ष प्रवेश अडकवला आहे. त्यांनी अनेकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं.’

साळगावकर यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच – केसरकर

साळगावकर यांनी केलेले आरोप केसरकरांनी फेटाळले आहेत. केसरकर म्हणाले की,  ‘बबन साळगावकर यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे. साळगावकर यांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्न पडत असल्याने हे आरोप करत आहेत. आतापर्यंत मी बबन साळगावकर यांना माझा राजकीय वारस म्हणत होतो. मात्र अशा आरोपांमुळे यापुढे माझे ते राजकीय वारसदार नसतील. त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही. जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर आहेत, तोपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश होणार नाही. ‘

राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध –

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. शिवसेनेला विचारात घेऊनच राणेंना प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तर नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबद्दल स्वत:च तारीख जाहीर केली आहे.

You might also like