आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकीविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहर पोलिस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्यासह इतर 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र जगताप यांनी शनिवारी हडपसर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गाडी समोर उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासास सुरवात केली. आत्महत्या करण्यापुर्वी जितेंद्र जगताप यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपुर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणभुत असल्याचे लिहीले होते. लोहमार्ग पोलिसांनी तपासाअंती नगरसेवक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक मानकर यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, जितेंद्र जगताप हे आपल्याला ब्लॅकमेलिंग करीत असल्याचे नगरसेवक मानकर यांनी दि. 1 जुन रोजी अर्जाव्दारे पोलिस आयुक्‍त कार्यालयाला कळविले होते. त्याची पोच पावती देखील मानकर यांच्याकडे आहे.

समर्थ पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या जागेच्या मिळकतीवरून जितेंद्र जगताप हे मानकर यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते. पैसे दिले नाही तर मी सर्मथ पोलिस ठाण्याच्या समोरील जागेवर आत्महत्या करेन अशी धमकी देखील जितेंद्र जगताप यांनी मानकर यांना दिली होती असे पोलिसांना दिलेल्या अर्जामध्ये नमुद करण्यात आलेले आहे. नगरसेवक मानकर यांनी दि. 1 जुन रोजी पोलिस आयुक्‍त कार्यालयात अर्ज दिला होता आणि दि. 2 जुन रोजी जितेंद्र जगताप यांनी रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. जितेंद्र जगताप यांचा मुलगा जयेश (28) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी भादंवि 306,506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र जगताप हे पुणे शहर पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस शैलेश जगताप यांचे मोठे भाऊ होते.