दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : निलंबित वन क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डीला नागपूरातून अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने बुधवारी रात्री उशिरा नागपूरात ही कारवाई केली. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता.

शासनाने त्याचे तातडीने निलंबनही केले होते. अमरावती पोलीस त्याचा शोध घेत होती. बुधवारी दुपारी त्याचे लोकेशन नागपूरात आढळून आल्यावर अमरावती पोलीस तातडीने नागपूरात दाखल झाले. त्यांनी गुन्हे शाखा व सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरु केली. रात्री उशिरा तो शहरातील एका हॉटेलजवळ पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.

डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच विनोद शिवकुमार पळून जात असताना पोलिसांनी त्याला नागपूर रेल्वे स्टेशनवर पकडले होते. त्यानंतर आता श्रीनिवास रेड्डी याला अटक केली आहे.