दीपाली चव्हाण प्रकरणानंतर तेलंगणा सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. पण आता शेजारील राज्य असलेल्या तेलंगणा सरकारनेही गंभीर दाखल घेतली असून, आता त्यानुसार परिपत्रकच काढले आहे.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये वन विभागातील अधिकाऱ्याचे नाव घेतल्यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले असून, हा अधिकारी सध्या अटकेत आहे. त्यानंतर आता तेलंगणा सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अशी घटना तिथे घडू नये म्हणून एक परिपत्रकच काढले. त्यानुसार, तेलंगणच्या वन विभागाने महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ताबडतोब सोडवण्यासाठी विविध पातळीवर समित्या स्थापन करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात सरकारने विशेष परिपत्रक काढल्याचे तेलंगणा सरकारच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. शोभा यांनी सांगितले.

अशा असतील समित्या…

तेलंगणच्या प्रधान मुख्य वंनसंरक्षक यांनी काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 4 पातळीवर समित्या असणार आहेत. त्यामध्ये वनपरिक्षेत्र, विभाग, जिल्हा आणि सर्कल असे आहे. विशेष म्हणजे यामध्ये बहुतांश वरिष्ठ महिला अधिकारी/स्टाफ असणार आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या या समित्यांमार्फत सोडवले जाणार आहेत.