गोळया झाडून आत्महत्या केलेल्या दीपाली चव्हाण आणि DFO शिवकुमार यांची ‘ती’ Audio व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अमरावती येथील धारणी तालुक्यातील हरिसाल मधील २८ वर्षीय वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) दीपाली चव्हाण यांनी शासकीय घरामध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. यावरून उपवनसंरक्षक (DFO) विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेण्यात आले. आज विनोद शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी कोर्टात आणलं गेलं. यावेळी कोर्टाच्या बाहेर वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांची शिवकुमार विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.

आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोटमध्ये तिचे आणि उपवनसंरक्षक (DFO) विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो संभाषण झालं त्याची ऑडिओ क्लिप सध्या प्रसारित होत आहे. यामध्ये शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात ते स्पष्ट होत आहे. शिवाय या ऑडिओ क्लिपमध्ये शिवकुमार हे बोलताना एखाद्या महिलेशी बोलताना कस बोलायचं याचं सुद्धा भान नसल्याचे दिसून येते. तसेच त्याचं संपूर्ण संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. शिवाय या क्लिपमध्ये दोघांच्या संवादात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांचा देखील उल्लेख आहे. संपूर्ण संभाषणादरम्यान दीपाली चव्हाण या अत्यंत नम्र भाषेत बोलताना दिसत आहेत तर शिवकुमार मात्र अत्यंत उर्मट भाषेत बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, अटक केलेल्या उपवनसंरक्षकाला तातडीने सेवेतून निलंबित करावे, संबंधित क्षेत्र संचालक व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही अटक करून त्यांना निलंबित करावे. या प्रकरणात IPS दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करून तातडीने गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.

दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहलंय?

ऑक्टोबर २०२० रोजी आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. परंतु , सलग ३ दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातूनही मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही. रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी यापूर्वी तुमच्याकडे तक्रार केली होती. मात्र, तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अजून याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नसताना तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला. माझ्या स्टाफ, गावकरी आणि मजूरांसमोर ते मला शिवीगाळ केल्याने ते मला सहन होत नाही. तर कित्येक वेळा रात्री त्यांनी मला बोलवले. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या मर्जीने न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे, इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही.