Deepali Chavan Suicide : दीपाली चव्हण यांचा धक्कादायक आरोप – ‘मला कच्च्या रस्त्यावरून फिरवलं, त्यामुळं गर्भपात झाला’

पोलिसनामा ऑनलाईन – मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (32) (Deepali Chavan) यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली. त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हरिसाल हे गाव धारणी येथून 25 किमीच्या अंतरावर आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्याच्या त्रासामुळं दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. यानंतर त्याला अमरावतील नेण्यात आलं. दीपाली त्यांच्या आत्महत्येनंतर 4 पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप यात करण्यात आला आहे. या सुसाई़ नोटमध्ये काय काय लिहलंय याची सविस्तर माहिती घेऊयात.

दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय ?

प्रति रेड्डी साहेब,
अपर प्रमुख संरक्षक,
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती

सर ज्यावेळेस धूळघाटमधून हरिसाल येथे माझी बदली झाली होती तेव्हा मी खूप खुश होते. कारण माझ्यावर चौकशी सुरू असूनही तुम्ही मला तुमच्याकडे घेतलं होतं. जेव्हा मला समजलं की, शिवकुमार मला DFO आहेत तेव्हा मला आणखी आनंद झाला. सरांची काम करण्याची पद्धत मला आवडायची. ते माझ्याशी खूप चांगले वागायचे. माझ्या रेंजची सर्व कामं सर्वात आधी पूर्ण व्हायची. त्यामुळं आमची रेंज पुढं जायला लागली तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी DFO चे कान भरायला सुरुवात केली.

‘नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडलं’

साहेब एवढ्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणतीही खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणं सुरू केलं. काही खटकलं तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे 3 गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडलं. ते फक्त आणि फक्त मला कमीपणा दाखवण्याचं कारण शोधत राहतात. मार्च 2020 मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणाबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटव अशा सूचना दिल्या. त्यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तिथले लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांना फोनवरून कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असं म्हणाले.

‘मी स्वत: SP ला बोलून तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी लावतो. 4 महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसं वाटतं हे दाखवतो’

जेव्हा गावकरी माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार होते. ते मी त्यांना कळवलं. त्यावेळी ते म्हणाले मी स्वत: SP ला बोलून तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी लावतो. 4 महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसं वाटतं हे दाखवतो. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे. या आधी खा. नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डींग ऐकवली आहे. अ‍ॅट्रॉसिटीत बेल न झाल्यानं मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवलं होतं. परंतु शिवकुमार यांनी मला रूजू करून घेण्यास नकार दिला. तसंच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शिफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार नाही दिला.

‘3 दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यावरून फिरवण्यात आलं. त्यामुळं माझा गर्भपात झाला’

ऑक्टोबर 2020 मध्ये आपण आझमरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळं मी ट्रेक करू शकत नव्हते. याबाबत मी पियुषा मॅडमला सांगितलं आणि घरी निघून गेले. परंतु त्यानंतर सलग 3 दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यावरून फिरवण्यात आलं. त्यामुळं माझा गर्भपात झाला. परंतु त्यातही मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही. रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लिल भाषेत बोलतात. मी आधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. परंतु तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होतं. त्यामुळं मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीनं येऊ तर शकतो. परंतु तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

‘कित्येक वेळा रात्री त्यांनी मला बोलावलं आहे, माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला’

माझ्या रेंजमधील सर्व कामे करूनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरून कामावर रूज होते नव्हते, परंतु तुमच्यामुळं झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरील राग वाढत चालला आहे. माझ्या स्टाफसमोर, गावकऱ्यांसमोर आणि मजुरांसमोर ते मला शिवीगाळ करतात. ते मला सहन होत नाही. त्यामुळं हे सांगत आहे. कित्येक वेळा रात्री त्यांनी मला बोलावलं आहे. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मर्जीनं न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाहीत.

‘माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आहेत’

दीपाली चव्हाण यांनी आपल्या नोटमध्ये अखेर लिहिलं आहे की, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की, माझे रोखलेले वेतन तात्काळ द्या. माझ्या मृत्यूनंतरचे सर्व आर्थिक लाभ माझ्या आईला द्यावेत. विनोद शिवकुमारबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात. कधी तरी त्यांना गांभीर्यानं घ्या. कारण त्या व्यक्तीमुळं तुमचंही नाव खराब होत आहे. त्यांचं अधिकाऱ्यांसोबतचं वागणं खराब आहे. ते खूप घाण घाण शिव्या देतात. फिल्डवर फार त्रास देतात. ते माझ्याशी फार खराब बोलतात. त्याचा मला मानसिक त्रास होतो. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आहेत. साहेब तुम्ही मला आतापर्यंत खूप सपोर्ट केला. तुमचे मनापासून आभार. माझ्या आईला सुखरुप गावी पोचवायला मदत करा आणि विनोद शिवकुमार यांच्यावर कारवाई कराल हीच शेवटची इच्छा. जे माझ्यासोबत झालं ते यापुढं इतर कोणासोबत होऊ नये असंही दीपाली चव्हाण यांनी आपल्या नोटमध्ये लिहिलं आहे.