PSI परीक्षेत साताऱ्याची दीपाली कोळेकर मुलींमध्ये प्रथम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन वर्षापासून पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेचा रखडलेला निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक भरतीचा निकाल जाहीर केला असून करमाळा येथील वैभव नवले हा परीक्षेत राज्यात पहिला तर दीपाली कोळेकर ही मुलींमध्ये पहिली आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने 2018 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासांठी मुख्य परीक्षा घेतली होती. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल नव्हता. त्यानंतर एक परीक्षा घेण्यात आल्याने आधीच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसाठी आयोगाने दोन वर्षापूर्वी 387 पदांची जाहिरात प्रसिध्द केली होती. यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यानुसार वैभव नवले हा पहिला, ज्ञानदेव काळे दुसरा तर भाऊसाहेब दहिफळे हा राज्यात तिसरा आला आहे.

या यादीमध्ये दीपाली कोळेकर चौथी आली असून राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे. दीपाली कोळेकर ही सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुसरोंड गावातील आहेत. तिचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत. दीपाली कोळेकर म्हणाली, परीक्षेसह सर्व प्रक्रिया होऊन दोन वर्षे झाली पण आता निकाल लागला आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाली पाहिजे. आम्हाला आता नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणासाठी जावे लागे. परंतु या ठिकाणी 2017 ला परीक्षा झालेल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे आम्हाला प्रशिक्षणासाठी काही महिने वाट पहावी लागणार आहे.