भारतीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अमेरिकेने दिला धीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखच्या गलवाण खोर्‍यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. या चकमकीननंतर अमेरिकेनंही प्रतिक्रिया देत आम्ही भारताच्या दु:खात सहभागी आहोत, असे म्हणत धीर दिला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी गलवान खोर्‍यात झालेल्या चीन आणि भारत चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. दु:खाच्या प्रसंगात आम्ही प्रत्येक शहीद भारतीय जवानाच्या कुटुंबासोबत आहोत, असेही ते म्हणाले. दरम्यान, चीनचे अधिकारी यांग जियाची यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतरच त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. यांग जियाची हेच भारत चीन सीमाप्रश्नी वाटाघाटी करणारे चीनचे प्रमुख आहेत. चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांप्रती आम्हाला अतीव दु:ख झाले आहे. शहीद सैनिकांबरोबरच त्यांच्या जाण्याने दु:खी झालेले त्यांचे कुटुंबीय, जवळच्या व्यक्ती आणि समाजाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, असे पॉम्पिओ म्हणाले.

यापूर्वी भारत चीन संघर्षावर अमेरिकेची नजर असल्याचे नमूद केले होते. शांततामय वातावरणात या प्रकरणी तोडगा काढण्याची आशाही अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली होती. अमेरिकेच्या गृह मंत्रालयानंदेखील शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली होती. तसंच दोन्ही देशांनी सीमेवरून मागे हटण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. आम्ही एलएसीवर असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. भारतीय लष्कराचे 20 जवान या चकमकीत शहीद झाले. त्यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.