बाबासाहेबांविषयी अवमानकारक वक्तव्य : खा. केशव धोंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भोकर- पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) –कंधारचे माजी खा.व माजी आ. केशव धोंडगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा असे निवेदन भोकरचे तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आले आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढून संविधान समर्थकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अनुसुचित जाती, जमाती तसेच आेबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे.

केशव धोंडगे कंधार येथील एका कार्यक्रमात बोलत होते. ‘बाबासाहेबांनी एकट्याने घटना लिहिली नाही तर त्यानी उत्कृष्ट कारागीर म्हणून रोजंदारीवर काम केले. बाकीचे काय दारू, गांजा, भांग पीत बसले होते काय?’, असे हीन दर्जाचे शब्द वापरून जातियदंगली भडकवणारे वक्तव्य केले आहे. दि २३ ऑक्टोबर रोजी कंधार येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. धोंडगे हे  पुरोगामी विचाराचे समजले जात असून कंधारमधील बहादरपुरा येथील ते रहिवासी आहेत. विशेष म्हणजे  हे त्याचे वक्तव्य सोशल मीडियावरही व्हायरल झाले असल्याचे समजते आहे.

धोंडगे यांनी स्वतः  शेतकरी समाज पक्षामध्ये काम केलेले असून पुरोगामी विचारांचा नेता म्हणून ते आेळखले जातात. एका पुरोगामी विचारांच्या नेत्याने बाबासाहेबांचा अवमान करणे म्हणजे खेदाची बाब आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आज तमाम संविधान समर्थक एससी, एसटी, ओबीसी, बहुजन लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

पोलीसांना देण्यात आलेल्या निवेदनात केशव धोंडगे यांच्यावर जातीय दंगली भडकवणे याबाबतची कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे, ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष नागोराव शेंडगे, आदिवासी विकास परिषदेचे श्रीराम वाकदकर, वंचित बहुजन आघाडीचे सचिव बि. एस. दुधारे, रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष राजेश चंद्रे, दत्ता डोंगरे, गुरू रविदास समता परिषदेचे ता.अध्यक्ष रमेश गंगासागरे, माजी प.स. सदस्य रामा भालेराव, वडार संघटनेचे उपाध्यक्ष शाम मेटकर, भाऊराव कावळे, जयभिम पाटील, संदीप गायकवाड, साहेबराव जोंधळे, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.