Pimpri : महापालिकेत बहुमताच्या जोरावर चुकीची कामे सुरू- अजित पवार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक वर्षे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. आज जो काही शहराचा विकास पाहायला दिसून येत आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे. आम्ही सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. उलट सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचीच सर्व विकासकामे मार्गी लावली. मात्र, भाजप सत्तेवर आल्यापासून अनेक प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे. महापालिकेत बहुमताच्या जोरावर चुकीची कामे सुरू असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी सोमवारी (दि. 23) केली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक चिंचवडगावातील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात झाली. या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे आणि मोदी लाटेमुळे 2017 ला महापालिका निवडणुकीत पराभव झाला. आता 2022 मध्ये होणा-या महापालिका निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे. त्यासाठी ढेपाळलेली संघटना अ‍ॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे. मागील चुका टाळून कामाला लागा, असेही आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

गुंडगिरी मोडीत काढा, राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही : पवार

शहरात गेल्या काही वर्षांत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वाहने जाळणे, तलवारी घेऊन फिरणे, दहशत माजविणे असे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करताना आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुंडगिरी मोडीत काढताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्णय घ्यायला हवेत, असेही पवार यावेळी म्हणाले.