‘टीम इंडिया’चा 2013 नंतरचा कसोटी सामन्यातील सर्वात मोठा पराभव, न्यूझीलंडनं 10 विकेटनं जिंकली पहिली कसोटी

वेलिंग्टन : वृत्त संस्था – भारत आणि न्युझीलंड यांच्यातील एक दिवसीस मालिका गमावल्यानंतर भारताची पराभवाची मालिका सुरुच राहिली असून पहिल्या कसोटीत टीम इंडियावर पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव सहन करण्याची वेळ आली. न्युझीलंडने भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात १० गडी राखून धुव्वा उडवला. २०१३ नंतर पहिल्यांदाच भारताला कसोटी सामन्यामध्ये एवढ्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा दुसरा डाव केवळ १९१ धावांवर संपला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या अवघ्या ९ धावा न्युझीलंडने सहज पूर्ण करीत विजय मिळविला.

२०१९ मध्ये एकही कसोटी न गमावणाऱ्या टीम इंडियाने २०२० मधील आपला पहिलाच कसोटी सामना गमावला व तोही तब्बल १० गडी राखून पराभूत झाला.न्युझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करीत भारतावर १८३ धावांची आघाडी घेतली होती. भारताने तिसऱ्या दिवसाअखेर ४ बाद १४४ धावा केल्या होत्या. तेव्हाच भारताचा पराभव निश्चित होता. भारताची सर्व मदार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्यावर होती.

चौथ्या दिवसांच्या खेळाची सुरुवात झाल्यानंतर अजिंक्य राहणे त्याचा धावांमध्ये ४ धावांची भर घालून परतला. हनुमा विहारी कालच्या धावांमध्ये एकही धावांची भर न घालता तंबूत परतला. त्यानंतर भारताचे शेपूट गुंडाळायला न्युझीलंडला वेळ लागला नाही. भारताचा सर्व डाव १९१ धावात गारद झाला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या ९ धावा एकही गडी न गमावता न्युझीलंडने पूर्ण करुन दोन कसोटीच्या मालिकेत १ -० अशी आघाडी घेतली आहे.