संरक्षण मंत्र्यांनी घेतली अभिनंदन यांची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला आहे. जखमी अभिनंदन यांच्यावर सध्या दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या ढाण्या वाघाची भेट घेतली आहे.

सकाळी अभिनंदन यांनी हवाई दलप्रमुख बी.एस. धनोआ यांची भेट घेतली. धनोआ यांना अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असताना तेथे नेमकं काय-काय घडलं, त्याची सर्व माहिती दिली. त्यानंतर सितारामन यांनी अभिनंदन यांची भेट घेतली. रविवारपर्यंत अभिनंदन यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, पाकिस्तानच्या एफ-१६ या लढाऊ विमानाचा फरशा पाडताना अभिनंदन यांचे मिग-२१ विमान कोसळलं. मात्र अभिनंदन हे पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरले. मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानने भारताला सुपूर्द केलं. त्यानंतर देशभरात अभिनंदन यांच्या वापसीचे स्वागत करण्यात आले.