सैनिक किंवा लष्करी अधिकाऱ्यांवर वेब सीरिज, सिनेमा किंवा डॉक्युमेंट्री करताना संरक्षण मंत्रालयाकडून घ्यावं लागणार NOC !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सिनेमा, डॉक्युमेंट्री किंवा वेब सीरिजमध्ये जर सशस्त्र सैनिक किंवा अधिकाऱ्यांना कोणत्याही रूपात दाखवलं जाणार असेल तर त्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल अशा सूचना संरक्षण मंत्रालयानं सेंसर बोर्डाला दिल्या आहेत. आता सिनेमा किंवा वेब सीरिजमध्ये लष्करी अधिकाऱ्यांची छवी चुकीच्या पद्धतीनं दाखवली जाण्यावर अंकुश लागणार आहे. सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांचे व्यक्तीमत्व आक्षेपार्ह पद्धतीनं दाखवलं जातं अशा अनेक तक्रारी संरक्षण मंत्रालयाला प्राप्त झाल्या आहेत. सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

काही प्ररकरणांमध्ये माजी सैनिकांसह दाखल केले FIR

संरक्षण मंत्रालयाकडे आलेल्या तक्रारींमध्ये कोड एम, XXX 2 अशा काही वेब सीरिजचा समावेश आहे. या तक्रारींमध्ये असा उल्लेख आहे की, सदर सीरिजमध्ये लष्कराबद्दल जे काही चित्रण करण्यात आलं आहे ते सत्यापासून कोसो दूर आहे आणि लष्कराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. काही माजी सैनिकांनी तर या प्रकरणी थेट एफआयआर दाखल केली आहे. त्यांनी या प्रकरणी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि संबंधित निर्मात्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

सशस्त्र दलांना चुकीच्या पद्धतीनं दाखवण्याबाबत अनेक तक्रारी

सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांचे व्यक्तीमत्व आक्षेपार्ह पद्धतीनं दाखवलं जातं अशा अनेक तक्रारी संरक्षण मंत्रालयाला प्राप्त झाल्या आहेत इतकंच नाही तर या वेब सीरिजमध्ये लष्करी गणवेशाचाही मान राखल जात नाही असंही तक्रारींमध्ये सांगण्यात आलं आहे.