संरक्षणमंत्र्यांचा शहिदांना चुकीच्या पद्धतीने ‘सॅल्युट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारमध्ये संरक्षणमंत्री झालेले राजनाथ सिंह यांनी शहिदांना केलेल्या सॅल्यूटवर आक्षेप एका वरिष्ठ लष्करी अधिका-याने घेतला आहे. राजनाथ सिंह यांच्याबरोबर तिनही सैन्य दलाच्या प्रमुखांनी चुकीच्या पद्धतीने सॅल्यूट केल्याचे अधिका-याने म्हटले आहे. लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

लेफ्टनंट जनरल एच.एस. पनाग यांनी लिहिलेल्या लेखात हा आक्षेप घेतला आहे. या लेखात त्यांनी म्हटले आहे की, राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तिनही दलाच्या प्रमुखांनी दिल्ली
येथील वॉर मेमोरिअलला भेट दिली. यावेळी चौघांनी हात उचावून शहिदांना सॅल्यूट केला. मात्र त्यांनी केलेला सॅल्यूट चुकीच्या पद्धतीचा होता. त्यांची सॅल्यूट करण्याची पद्धत ही नाझी सैन्याच्या पद्धतीप्रमाणे असल्याचे सांगत हा शहिदांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

सैन्य दलामध्ये सॅल्यूट करण्याला खूप महत्व असते. सैन्यांचा नियमित अभ्यास, शिस्त आणि आदेशाचे पालन करण्याचे प्रतिक म्हणून सॅल्यूटकडे पाहिले जाते. तसेच सैन्यामध्ये रँकप्रमाणे सॅल्यूट करण्याची पद्धत आहे. जर सैन्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी ढिल्या स्वरुपात सॅल्यूट दिला तर ते नव्या जवानांसाठी रोल मॉडेल ठरतील का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.