दिल्लीमध्ये 30 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गेल्या वर्षी कोरोनाने जसे थैमान घातले होते. त्याचप्रमाणे यंदाही कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिलपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. संचारबंदीबाबत दिल्ली मुख्य सचिवांकडून आदेश जारी करण्यात आले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी दिल्ली सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. संचारबंदीत अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. मात्र इतरांना या कालावधीत बाहेर फिरण्यास मनाई असेल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सातत्याने लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशात रात्रीच्या संचारबंदीच्या माध्यमातून हालचालींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे. सोमवारी दिल्लीत कोरोनाचा पॉझिटिविटी रेट हा ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर सरकरने निर्णय घेतला आहे.

मागील ३ महिन्यांपासून लसीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे ही लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता इतर अटी हटवून शाळा, सार्वजनिक भवन आणि इतर ठिकाणी मोठ्याप्रमाणावर लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी दिली पाहिजे. तसेच केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरणासाठी वयाची मर्यादा संपवण्याची मागणी केली आहे. जेवढ्या जास्त लोकांचे लसीकरण होईल तितका हा विषाणू पसरण्याचा धोका कमी होईल. असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.

रात्रीच्या संचारबंदीतील नियम –

–  संचारबंदी वेळी आवश्यक सेवांशी निगडीत लोकांशिवाय इतरांनी फिरण्यास मनाई असेल

–  सरकारने याबाबत संपूर्ण यादी जारी केली आहे. ज्यांना या संचारबंदीतून सूट मिळाली आहे. त्यांना श्रेणीत विभागण्यात आले आहे.

–  अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवावे लागेल. काही श्रेणींमध्ये लोकांना ई-पास घ्यावा लागेल.

–  आंतर राज्य आणि राज्यांतर्गत, माल वाहतुकीवर कोणतेही बंधन नाही. यासाठी वेगळ्या परवानगीची किंवा इ-पासची गरज नसेल.

–  रात्रीची संचारबंदी त्वरीत लागू होईल. ती ३० एप्रिलपर्यंत कायम असणार आहे.

–  दिल्लीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कारण दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.