कौतुकास्पद ! शेतकर्‍यानं कामगारांना चक्क विमानातून पाठवलं स्वगृही

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीतील विमानतळावरुन पाटणासाठी १० कामगार विमानाने रवाना झाले. आयुष्यात कधी विमानात बसू असे वाटले नसताना एका शेतकर्‍यांने त्यांच्याकडे काम करणार्‍या बिहारी कामगारांना चक्क विमानाने त्यांच्या गावी पाठविले. निरंजन गहलोत असे या शेतकर्‍याचे नाव आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक उद्योजक, शेतकरी, नोकरदार अडचणीत आले आहेत. अशा वेळी अनेक उद्योजकांनी आपल्याकडील कामगारांना वार्‍यावर सोडले. कामावरुन काढून टाकले. अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडे इतकी वर्षे राबलेल्या कामगारांची लॉकडाऊनच्या काळात काहीही सोय केली नाही. त्यांना पगारही दिला नाही. उपवास घडत असल्याने लाखो मजूर आपल्या कुटुंबासह शेकडो किमीचा पायी प्रवास करु लागले होते. अशावेळी दिल्लीतील या शेतकर्‍यांच्या या दातृत्वाचे कौतुक होऊ लागले आहे.

गेहलोत हे एक मशरुमचे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे हे १०कामगार काम करीत होते. लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्स सर्व बंद असल्याने त्यांच्या मशरुमला कोणी ग्राहक मिळाले नाही. लाखो रुपयांचे मशरुम फेकून देण्याची वेळ आली. तरीही त्यांनी आपल्या कामगारांचा संभाळ केला. आता गावी परत जाण्याची सुविधा सुरु झाली. तेव्हा त्यांनी आपल्या कामगारांना गावी पाठविण्यासाठी रेल्वेची तिकीटे बुक करण्याचा प्रयत्न केला. पण ती मिळू शकली नाही.

याबाबत निरंजन गहलोत यांनी सांगितले की, हे लोक गेली २० वर्षे आमच्याबरोबर काम करीत आहेत. त्यांचा प्रवास सुरक्षित असावा, म्हणून आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या विमानाची तिकीट आरक्षित केली. या कामगारांपैकी एकाने सांगितले की, मी विमानात बसू असे मला कधी वाटले नव्हते. आमच्या मालकाने आमच्यासाठी व्यवस्था केली. दिल्ली विमानतळावर या कामगारांना गेहलोत हे स्वत: घेऊन आले होते. गुरुवारी सकाळी हे कामगार विमानाने पाटणाला रवाना झाले.