दिल्लीत संसद भवनावजवळ काश्मीरचा संशयित तरुण ताब्यात, कागदावर मिळाले ‘कोडवर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीतील संसद भवनावजळ एका संशयित काश्मीरच्या तरुणाला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याजवळ कोडवर्ड लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. विजय चौकात संशयास्पद स्थितीत फिरताना त्याला सीआरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेतले. चौकशीत तो वेगवेगळी माहिती देत असल्याने आणि संसद भवन परिसर हा हाय सेक्युरीटी झोन असल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.

सीआरपीएफच्या जवानांनी या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर संसदभवन मार्ग पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत त्याने वेगवेगळी माहिती दिली. त्याच्या जवळ आधार कार्ड आणि ड्रायव्हींग लायसन्स सापडलं आहे. मात्र, त्या दोन्हीवर त्याची वेगवेगळी नावे आहेत. ड्रायव्हींग लायसन्सवर त्याचं नाव फिरदौस असं असून आधार कार्डवर त्याचं नाव मंजूर अहमद अहंगेर असं आहे. तो दिल्लीत कुठे राहतो आणि कधी आला याबद्दल त्याच्या माहितीत तफावत आढळून आली आहे.

त्याच्या बॅगेमध्ये एक चिठ्ठी सापडली असून काही कोडवर्ड लिहिल्याचंही आढळून आलं आहे. ते नेमकं काय आहे याचं डिकोडिंग करण्याचं कामही करण्यात येत आहे. काश्मीर मधल्या बडगाम इथला तो रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. आयबीसह गुप्तचर संस्था आणि पोलीस त्याची चौकशी करत आहे. सर्वोच्च सुरक्षा असतांनादाखील हा युवक संसद भवनाजवळ आढळल्याने सर्व तपास यंत्रणांनी आढावा घेतला आहे. संसदेवरच्या हल्ल्यानंतर संसदभवना भोवती अनेक स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ती भेदून जाणं अशक्य समजलं जातं.