दिल्ली अग्नीतांडव : 43 लोकांची स्मशानभुमी बनलेल्या फॅक्टरीचा मालक रेहानला अटक, भाऊ ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या धान्य बाजार परिसरात लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी बहुतेक कामगार या इमारतीत असलेल्या छोट्या कारखान्यात काम करणारे मजूर होते. यांतील बहुतेक कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशमधील होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कंपनीचा मालक रेहान याला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. तर रेहानचा भावाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रात्री कंपनीत काम करणारे बहुतेक कामगार कंपनीमध्येच झोपले होते. प्रत्येक खोलीत 10 ते 15 कामगार होते. हे कामगार दिवसभर काम करून रात्री जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी झोपी जात असत. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास या ठिकाणी आग लागली. यामध्ये झोपलेल्या 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना तातडीने एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 30 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगिवर निंयत्रण मिळवले. आग आटोक्यात आली असली तरी इमारतीच्या खिडक्यांमधून काळा धूर निघत आहे. यामुळे आत आग सुरु असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Visit : Policenama.com