‘या’ विद्यापीठातून पास होणाऱ्याला प्रत्येकाला मिळणार नोकरी , पुढील वर्षांपासून मिळणार लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यांकडून नुकतीच नवीन महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. Delhi Skill and Entrepreneurship University असं या विद्यापीठाचं नाव आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. तसेच या महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे.या विद्यापीठातून कंपन्यांना मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे.

या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिनियमानुसार करण्यात आली आहे. या विद्यापीठाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले,आज या विद्यापीठाची पहिली बैठक पार पडली यामध्ये कुलपती आणि बोर्डाच्या सदस्यांचा समावेश होता. या महाविद्यालयाच्या स्थापनेमागे प्रत्येकाला रोजगार मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच वीन व्यापार करण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा देखील यामागील उद्देश आहे.या ठिकाणी विद्यार्थ्यांना कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून याठिकाणी शिकत असतानाच रोजगार मिळवू शकतील यासाठी सरकार कंबर कसून काम करत आहे.

सरकारकडून या विद्यापीठासाठी कुलपती म्हणून आयआयएम-अहमदाबादमधील सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिपच्या प्रमुख डॉ. निहारिका व्होरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे संस्थापक डीन प्रमथ राज सिन्हा, जॅनपॅक्टचे संस्थापक प्रमोद भसीन, नोकरी डॉटकॉमचे संस्थापक संजीव बिखचंदानी, उद्योजक श्रीकांत शास्त्री आणि आयपी विद्यापीठाचे संस्थापक के. के. अग्रवाल यांचा समावेश आहे. पहिल्या सत्राविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, ‘या विद्यापीठामध्ये गुणवत्ता आणि योग्य शिक्षणावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे तसेच अनेक कंपन्यांशी करारदेखील केला जाणार आहे.