दिल्ली विधानसभा : ‘आप’ च्या तब्बल 36 उमेदवारांवर गुन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच राजकीय पक्षांशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या 672 उमेदवारांपैकी 20 टक्के म्हणजेच 133 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॅर्म (एडीआर) च्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.

एमडीआर या संस्थेच्या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे 25 टक्के उमेदवार आणि भाजपचे 20 टक्के उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर गंभीर गुन्हे असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेसच्या 15 टक्के उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीचे मतदान येत्या 8 फेब्रुवारीला होत असून निकाल 11 फेब्रुवारीला घोषीत होणार आहे. या निवडणुकीत 672 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

एमडीआर या संस्थेच्या अहवालानुसार आपच्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर भाजपच्या 67 पैकी 17 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये तिसऱ्या क्रमांक काँग्रेसचा तर बसप चौथ्या स्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या स्थानी असून 2015 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत कलंकित उमेदवारांची सख्या जास्त आहे. 2015 च्या निवडणुकीत 673 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 114 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल होते.