दिल्ली विधानसभा : प्रचाराच्या ‘तोफा’ थंडावल्या, 8 फेब्रुवारीला ‘मतदान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरोप-प्रत्यारोपात रंगलेला दिल्ली विधानसभेचा प्रचार आज (गुरुवार) सांयकाळी सहा वाजता थंडावला. आता 8 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. प्रचाराची मुदत संपल्याने कोणताही पक्ष प्रचार करु शकणार नाही. दिल्लीतील सर्व 70 जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. प्रचारादरम्यान आम आदमी पक्ष आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी खूप मेहनत घेतली असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे 11 तारखेला समजणार आहे.

आम आदमी पक्षाकडून प्रचाराची धुरा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांभाळली होती. आपकडून मनीश सिसोदिया, संजय सिंह, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन आणि अमानतुल्लाह खान यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करून पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच आपने निवडणुकीचा प्रचार सुरु केला होता. तर भाजपने देखील या निवडणुकीत जोरादार प्रचार केला.

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली आहे. त्यासाठी त्यांनी ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांना दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरवले होते. यामध्ये योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान, नीतीश कुमार यांच्यासह स्टार प्रचारकांची फौज प्रचारासाठी मैदानात उतरवली होती. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील दिल्लीत सभा घेऊन पक्षाची बाजू मतदारांपर्यंत पोहचवली.

काँग्रेसचा प्रचार सुरुवातीला संथ गतीने सुरु होता. मात्र, मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी प्रचाराची गती वाढली. काँग्रेसने पक्षाचा प्रचार करण्यासाठी अनेक बड्या नेत्यांना प्रचारात उतरवले होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार करत प्रचार सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. राहुल आणि प्रियंका यांनी आपल्या प्रचाराच्या सभेत सत्ताधारी आप आणि भाजपर निशाणा साधला.