केजरीवालांनी दिलं पाकिस्तानच्या मंत्र्याला ‘ठासून’ प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मोदीजी माझे पंतप्रधान आहेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान सतत चर्चेत राहिला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केलेल्या विधानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानी मंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. माझे पण पंतप्रधान आहेत. दिल्लीची निवडणूक हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांचा हस्तक्षेप आम्ही सहन करत नाही. पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी ते या देशाच्या ऐक्यावर हल्ला करू शकत नाहीत. ”

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात ट्विट केले. ज्यात चौधरी यांनी सीएए, ढासळणारी अर्थव्यवस्था आणि काश्मीरचा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.

कोण आहेत पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी?
फवाद चौधरी हे पाकिस्तान सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. ते नेहमीच चर्चेत असतात. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी एका विवाह सोहळ्यात टीव्ही अँकरला चापट मारली होती. त्यांनतर प्रकरण वाढले आणि अँकर आणि मंत्री यांच्यात मारहाण झाली होती.

दिल्ली निवडणुकीत पाकिस्तान :
दिल्लीच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानला सतत धारेवर धरले जात आहे. याआधी आम आदमी पार्टीतून भाजपमध्ये आलेले आणि मॉडेल टाऊनचे उमेदवार कपिल मिश्रा म्हणाले होते की, 8 फेब्रुवारीला दिल्लीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. तसेच दिल्लीत बरीच मिनी पाकिस्तान असल्याचे सांगत त्यांनी शाहीन बागची तुलना मिनी पाकिस्तानशी केली. कपिल मिश्रा यांच्या विधानानंतर प्रचंड गदारोळ झाला. निवडणूक आयोगाने हे ट्विट हटवण्यास सांगितले होते. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी कपिल मिश्रांविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि कपिल मिश्रा यांना 48 तास प्रचार करण्यावर बंदी घातली होती.