‘मेरा ये ‘ट्वीट’ संभाल के रखो’, दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांचा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत शनिवारी मतदान झाल्यानंतर जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये अरविंद केजरीवाल हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यावर मनोज तिवारी यांनी एक ट्वीट करुन भाजपा ४८ जागा जिंकून सरकार बनविणार असल्याचा दावा केला आहे.

एक्झिट पोल आल्यानंतरही भाजपाने विजयाची उम्मीद सोडलेली नाही. दिल्ली बीजेपीचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी एक्झिट पोलचा दावा नाकारला आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘सर्व एक्झिट पोल फेल होणार आहेत. माझे हे ट्वीट संभाळून ठेवा. बीजेपी दिल्लीत ४८ जागा जिंकून सरकार बनविणार आहे. कृपया ईएमव्हीला दोष देण्याचा बहाणा शोधू नका’’.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले असून येत्या ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये सर्वांनीच आपला बहुमत मिळणार असून पुन्हा एकदा दिल्लीत भाजपाची धुळधाण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फक्त टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा सर्वाधिक २६ जागा दाखविण्यात आल्या आहेत. त्यात आप ४७ आणि भाजपा २६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दिल्ली विधानसभेत ७० जागा असून बहुमतासाठी किमान ३६ जागांची आवश्यकता आहे. दिल्लीत आप आणि भाजपा यांची सरळ लढत होत असून तिसरा पक्ष काँग्रेसला एखादी जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निकालानंतर इतर छोट्या पक्षांना आपल्याकडे आकृष्ट करुन सरकार बनविण्याचा पर्यायही इथे भाजपासमोर नाही. टाइम्स नाऊने सर्वाधिक २६ जागा दाखविल्या आहेत. तरीही बहुमतासाठी आणखी १० जागांची आवश्यकता भासणार आहे.