दिल्ली : निकालापुर्वीच भाजपनं स्विकारला ‘पराभव’ ? जाणून घ्या ‘व्हायरल’ झालेल्या ‘त्या’ फोटचं ‘वास्तव’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आज सकाळपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी सुरू झाली आहे. काही कल स्पष्ट होत आहेत. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला अनुकूल असे आतापर्यंतचे कल दिसत आहेत. 70 जागांसाठी सध्याच्या स्थितीनुसार आप 56 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर आहे. मात्र मतमोजणी अद्याप पहिल्या टप्प्यात असतानाच भाजपाने पराभव स्वीकारला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लावण्यात आलेले पोस्टर या चर्चेला कारण ठरले आहे.

भाजपाच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या पोस्टरवर अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो असून त्यावर लिहिले आहे की, विजयामुळे आम्ही अहंकारी होत नाही अन पराभवामुळे निराश होत नाही. हे पोस्टर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र हे पोस्टर दोन वर्षांपूर्वीचे असल्याचे काहींचे म्हणणे आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांचेही असेच फोटो लावण्यात आले आहेत.

सर्वच एग्झिट पोलने दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल, असा स्पष्ट अंदाज वर्तवला आहे. केजरीवाल यांनीही काल कार्यकर्त्यांना विजयी जल्लोषात फटाके फोडू नका असे आवाहन केले होते. यामुळे पराभवाचा अंदाज आल्यानेच भाजपाने आपल्या दिल्ली कार्यालयात वरील प्रकारचे पोस्टर लावल्याचे बोलले जात आहे.

भाजपाच्या व्हायरल पोस्टरची चर्चा सर्वत्र सुरू असताना पुन्हा एकदा दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी बहुमत मिळण्याचा दावा केला आहे. मी निराश नाही. भाजपसाठी आजचा दिवस चांगला ठरेल, मला आत्मविश्वास आहे. आम्ही सत्तेत येणार आहोत. भाजपला 55 जागा मिळाल्यास आश्चर्य वाटून देऊ नका, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेच्या रणधुमाळीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. भाजपाने अतिशय आक्रमक होत आपले शेकडो नेते रणांगणात उतरवले होते. शिवाय धार्मिक धुव्रीकरणाच्या प्रचारावर जोर दिला होता. मतदानांनतरही भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, 2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसला धुळ चारली होती. आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला 3 तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. आज आम आदमी पार्टी किती जागा मिळवते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.