…तर भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार राजकारणातून ‘संन्यास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दिल्लीत प्रचाराचा जोर वाढत असून राजकीय वातावरण तापले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा पाढा वाचून दाखवत मतदारांनी आपल्याला पुन्हा सत्तेत पाठवावे अशी मागणी करत आहेत. तसेच दिल्लीकरांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीने केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. तर केजरीवाल यांनी दिल्लीकरांची फसवणूक केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच पुढील पाच वर्षात केजरीवाल सरकारपेक्षा पाच पटीने अधिक काम करण्याचा दावा भाजपने केला आहे.

भाजपने पढील पाच वर्षात केजरीवाल सरकारपेक्षा पाच पटीने अधिक काम दिल्लीच्या जनतेसाठी केले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असे भाजपचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीत सांगितले. शाळा, बेरोजगारी, प्रत्येक नागरिकाला अनुदान दिल्याचा जो दावा आम आदमी पार्टीने मागील पाच वर्षात केला आहे, त्याच्या पाच पटीने अधिक भाजप दिल्लीतील जनतेला देईल, असे मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.

मनोज तिवारी पुढे म्हणाले, दिल्लीतील प्रत्येक घरात शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. पाच हजार नवीन इलेक्ट्रॉनिक्स बसेस तसेच सीएनजी बसेससोबत दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी चांगली करण्याचे लक्ष आहे. दिल्लीत बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या रुग्णालयांसाठी योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांची कसोटी लागणार आहे. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यामध्येच खरा सामना रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष मतदारांचे मत आपल्या पारड्यात कशा पद्धीने पाडून घेता येईल याचा प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दूरावलेला जनधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/