दिल्ली विधानसभा : BSP च्या उमेदवारावर ‘हल्ला’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नारायण दत्त शर्मा यांच्यावर ८ ते १० जणांनी हल्ला केला. त्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटून त्या शर्मा यांना लागल्याने ते जखमी झाले आहेत. नारायण दत्त शर्मा हे बदरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ते एक मिटिंग संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर ८ ते १० जणांनी दगडफेक करुन हल्ला केला. त्यात गाडीच्या काचा फुटल्या व त्यात आत बसलेल्या नारायण शर्मा यांना लागल्या.

शर्मा हे २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपच्या तिकीटावर बदरपूरमधून निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी आपने त्यांना तिकीट न देता काँग्रेसमधून आपमध्ये प्रवेश केलेल्या राम सिंह यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शर्मा यांनी आप सोडताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना २० कोटी रुपयांच्या बदल्यात बदरपूरचे तिकीट भू माफियांना विकल्याचा आरोप केला होता. आपण ज्यांच्याविरुद्ध निवडणुक लढवत आहोत, त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.