दिल्लीत धुक्यामुळे विमाने जमिनीवरच, विमानतळावर शुन्य दृश्यमानता, 25 रेल्वेगाड्यांना उशीर

दिल्ली : दिल्लीसह (Delhi)  संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर धुके पडल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे़ जवळपास २५ रेल्वेगाड्या उशिराने धावत असून अनेक विमाने अजून जमिनीवरच थांबून आहेत. दिल्ली (Delhi) , लखनौ, अमृतसर या विमानतळावर शुन्य दृश्यमानता नोंदविली गेल्याने या विमानतळावरुन सकाळी एकही विमान उड्डाण घेऊ शकले नाही. आतापर्यंत केवळ दोन विमान विमानतळावर उतरली आहेत.

 

 

 

 

 

 

दिल्ली विमानतळावर सकाळी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले असले तरी अगदी समोरचेही काही दिसू शकत नाही, इतके धुके पसरले आहे. त्यामुळे दिल्ली व परिसरातून जाणार्‍या २५ रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीसह अमृतसर, लखनौ विमानतळावर शुन्य दृश्यमानता असल्याने तेथून विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले असून प्रवाशांनी त्यांच्या विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विमानतळावर करण्यात येत आहेत.

या धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी दिसत असून धुक्यामुळे त्यांच्या वेगावरही परिणाम झाला आहे.

अशाच प्रकारे उद्या १७ जानेवारी रोजी धुके असण्याची शक्यता असून १८ जानेवारीला त्यात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.