दिल्लीतील लेखिकेचे अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र; म्हणाल्या- ‘तुमच्या देवाचे पाय मातीचे अन् हात रक्ताने माखले आहेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, लस आदीचा तुटवडा जाणवत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोना संकटात भारताला अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, यावरून आता पंतप्रधान मोदींवर टीका होत आहे. दिल्लीतील लेखिका विनिता मोक्किल यांनी अमेरिकेतील पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांना खुले पत्र लिहिले असून तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले असून मदत न करण्याचा सल्ला दिला आहे. तुमचा देव हिंदूंचा रक्षक असल्याचा दावा करतो. मात्र, त्यांनी कुंभमेळ्याला परवानगी का दिली, अशी विचारणाही त्यांनी पत्रातून केली आहे.

मोक्किल यांनी लिहलेला हा लेख दक्षिण आशियाई अमेरिकन संकेतस्थळ अमेरिकन कहानी यावर प्रकाशित झाला आहे. कोरोना संकटाचा हा कालावधी भक्तांना आत्मनिरीक्षण करण्यासाठी एकदम योग्य आहे. एकीकडे ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडून मृत्यू पावत आहेत. तर दुसरीकडे तुमचा देव 22 कोटींचा महाल साकारण्यात गुंतल्याची बोचरी टीका त्यांनी पत्रातून केली आहे. तसेच गर्वाने परिपूर्ण योजना राबवत असताना, दुसरीकडे मात्र कोरोनाच्या लसी आयात करण्याचे निर्देश द्यायला विसरले. परंतु, हीच गोष्ट होती, जी भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचवू शकत होती, असा घणाघात विनिता यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदी यांनी निवडणुका जिंकण्यासाठी जय श्रीरामचा वापर केला, जप केला. मुस्लिम समुदायाला हिंदूविरोधात उभे करण्याचे काम त्यांनी केले. समाजातील तणाव वाढण्यासही ते कारणीभूत असल्याचा दावा या लेखिका विनिता यांनी केला आहे.