दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मुलीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता यांना ऑनलाईन सोफा विकणे चांगलेच महागात पडले असून सायबर चोरट्यांनी त्यांना ३४ हजार रुपयांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी हर्षिता यांनी दिल्ली पोलिसांच्या उत्तर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षिता केजरीवाल यांनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी एक सोफा ठेवला होता. तिच्याकडे एका माणसाने संपर्क साधला. त्याने सोफा खरेदी करण्यास रस दर्शविला. त्यासाठी खात्याचा तपशील बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी सुरुवातीला त्याने तिच्या खात्यात काही पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर त्या सायबर चोरट्याने क्युआर कोड पाठविला आणि तिला स्कॅन करण्यास सांगितले. ज्यायोगे करारात ठरविलेली रक्कम तिच्या खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते, असे सांगितले. त्यानुसार तिने तो क्युआर कोड स्कॅन केला. त्याबरोबर तिच्या खात्यातून २० हजार रुपये ट्रान्सफर केले गेले. त्यानंतर तिने चौकशी केल्यावर त्याने चुकून चुकीचा क्युआर कोड पाठविला आहे असे सांगून तिला दुसरा क्युआर कोड पाठविला व तो स्कॅन करायला सांगितला. त्याचे ऐकून तिने पुन्हा दुसरा क्युआर कोड स्कॅन केल्यावर तिच्या खात्यातून १४ हजार रुपये ट्रान्सफर केले गेले, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.