‘२०१९ ला २०१४ ची पुनरावृत्ती नको’

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला उधाण येताना दिसते. दिल्लीत बुधवारी (ता.१३)  विरोधकांची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकांच्‍या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘‘२०१४ च्‍या निवडणुकीत जनतेने बारावी पास व्‍यक्‍तीस देशाचे पंतप्रधान बनवले. आता मात्र २०१९ मधील निवडणुकीत जनतेने आपली चूक सुधारुन एखाद्या सुशिक्षित व्‍यक्‍तीस पंतप्रधान बनण्‍याची संधी द्यावी’’. अशा शब्दात त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, “गेल्यावेळी तुम्ही बारावी पास व्यक्तीला पंतप्रधान म्‍हणून निवडले. आता या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीस पंतप्रधानपदी संधी द्या. पंतप्रधानपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. बारावी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे हेच समजत नाही’’.

केजरीवाल यांनी राफेलच्या मुद्द्यावरूनही मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मोदी सरकारच्या काळातील राफेल करारात विमानांसाठी जास्त पैसे द्यावे लागले. यासाठी मोदीच जबाबदार आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या विमान कंपनीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करणे कितपत योग्य आहे, असा सवालही केजरीवाल यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय राफेल करारातील सत्य बाहेर आल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल”. असे मतही त्‍यांनी व्यक्‍त केले.