‘जर मी काम केलं असेल तरच मतदान द्या, अन्यथा नका देऊ’ ! दिल्लीतील निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर CM केजरीवालांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली असून येत्या 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम्ही काम केले असेल तरच मतदान करा. अन्यथा मतदान करु नका, असे आवाहन दिल्लीकरांना केले आहे.
विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी हे आवाहन केले आहे. यंदा लोक पहिल्यांदाच सकारात्मक मतदान करतील. दिल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीकर सकारात्मक मतदान करतील. यावेळी आम्ही कामाची तुलनाही करणार आहोत. तसेच भाजपवाल्यांकडूनही मतं मागणार असून काँग्रेसवाल्यांकडेही मतं मागणार आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

आम्ही काम केले असेल तर तुम्ही आम्हाला मतदान करा. जर आम्ही काम केलं असेल तर आम्हाला दुसऱ्यांदा सरकार बनवण्याचा अधिकार पोहोचतो. आम्हाला घाणेरडं राजकारण करायचं नाही. आम्हाला दिल्लीचा विकास करायचा आहे. त्यासाठी आम्हाला दिल्लिकरांनी सहकार्य करायला हवं. दिल्लीकरांनी झालेल्या कामाच्या, विकासाच्या आधारेच मतदान करावं. आमची पूर्ण निवडणूक मोहीम सकारात्मक असेल, असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. दिल्लीत पोलीस, पालिका आणि डिडिए सांभाळण्याची जबाबदारी भाजपची आहे. आम आदमी पार्टीकडे पाणी पुरवठा महामंडळ आणि पीडब्ल्यूडीसह इतर विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाजप आणि आपमध्ये कुणी चांगलं काम केले हे लोक पाहतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आम्हाला वाईट राजकारण करायचे नाही असे सांगत त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीमधील एका कार्यक्रमादरम्यान शहा यांनी दिल्लीच्या विकासावर बोलण्या ऐवजी त्यांनी आम्हाला शिव्या घातल्या. प्रत्युरात आम्ही त्यांना शिव्या घालणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/