स्वतःच्या मुलीचा छळ केल्याचा कॉंग्रेस नेत्यावर आरोप, महिला आयोगाने केली पीडितेची सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तत्कालीन शीला दीक्षित सरकारमधील काँग्रेसचे मंत्री राजकुमार चौहान यांच्यावर स्वतःच्या विवाहीत मुलीनेच आपल्याला घरात कैद करून बेदम मारहाण करत छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मुलीने दिल्लीच्या महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार,चौहान यांच्या पश्चिम विहार येथील निवासस्थानातून पीडीत मुलीची आयोगाने सुटका केली आहे.

राजकुमार चौहान हे चार वेळा आमदार होते. तसेच ते शीला दीक्षित सरकारमध्ये ते मंत्रीही होते. पीडित मुलीने महिला आयोगाला पत्र लिहून आपल्याला मुक्त करा अशी मागणी केली होती. त्यानुसार महिला आयोगाने तातडीने दखल घेत संबधित मुलीला मुक्त केले. मात्र चौहान यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

महिला आयोगाने सांगितले की, पीडित महिलेला चौहान यांच्या घरात कैद केले होते. तिला तिचे वडील आणि भाऊ बेदम मारहाण करत असत. याबाबत पीडितेने तक्रार केल्यानंतर त्वरीत आयोगाचे सदस्य पोलिसांसह दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. त्यावेळी पीडित महिलेने तिचे 1999 मध्ये विवाह झाल्याचे सांगितले. पतीबरोबर तक्रार झाल्यानंतर गेल्या 10 वर्षांपासून पीडिता आपल्या माहेरी राहत असून आपल्याला दोन मुली असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली महिला आयोगाचा सोमवारी पीसीआर कॉल आला होता. त्यात त्यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणात मदत मागितली होती. त्यानंतर आयोग आणि पोलिसांचे एका पथकाने तक्रारकर्त्याची भेट घेतली. पीडित महिला आपल्या दोन मुलींसह चौहान यांच्या निवासस्थानातील एका मजल्यावर राहते.

घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित

पीडित महिलेचा चंदीगड न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित आहे. आपल्या वडिलांना वाद संपुष्टात येऊ नये असे वाटत होते. त्याच कालावधीत त्यांच्या पतीने दुसरे लग्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिला आयोगाने पीडित महिलेला तेथून मुक्त करुन पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आयोगाने पोलिसांना नोटीस जारी करुन एफआयआर का दाखल केला नाही, असा सवाल केला आहे.